शैक्षणिक अपडेट 2022 : राज्यातील पीएच.डी. धारक शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत पीएच.डी. धारक शिक्षकांना आता ‘ क्लास वन अधिकाऱ्यांचा ‘ दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिक्षकांचे ‘क्लास वन’ अधिकारी होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.शालेय शिक्षण विभागातील क्लास वन, क्लास टू अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशी अनेक पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. या रिक्त जागांवर पीएच.डी. झालेल्या शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात होती. याची दाखल घेत महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
शिक्षक संघटनांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलंय. मुलांना शिकवतानाच शिक्षकांचाही शैक्षणिक विकास होत असतो. असे शिक्षक हे अधिकारी झाल्यास शिक्षण क्षेत्राला त्याचा फायदाच होणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिली आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 200 हून अधिक शिक्षक पीएच.डी. धारक शिक्षक!
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 200 हून अधिक शिक्षक पीएच.डी. धारक आहेत. मात्र, थोडी फार पगारवाढ मिळण्यापलिकडे त्याचा त्यांना फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे काही शिक्षक तर नावाच्या आधी ‘डॉक्टर’ लावणंही टाळतात. शिक्षक संघटनांच्या मागणीची दखल घेऊन, ग्रामविकास खात्याने सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलंय. त्यात वरिष्ठ अधिकारी पदासाठी पात्रता असणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे शिक्षक वरिष्ठ अधिकारी होऊ शकतात.