राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे , अशा भागातून शाळा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून दिनांक २४ जानेवारी , २०२२ पासून पुन्हा सुरू करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद यांना शाळा सुरू करण्याचे अधिकार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संदर्भिय दिनांक २० जानेवारी , २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान केलेले आहे .
आता , त्याच धर्तीवर विभागांतर्गत मागासवर्गीय मुलामुलींसाठीची शासकीय वसतीगृहे तसेच अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा दिनांक २४ जानेवारी , २०२२ पासून सुरू करण्याबाबत स्थानिक परिस्थितीचा विचार करून महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद या स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरू करण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी . तसेच , यासंदर्भात शाळा , वसतीगृहे सुरू करण्याबाबत वेळोवेळी शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे सूचित करण्यात आले आहे.