शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिवाळीत शाळांना दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, तर माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 20 ऑक्टोबरला संपेल, तर दिवाळीला सुरुवात वसुबारसेपासून (21 ऑक्टोबर) होणार आहे. त्यानुसार, प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या आहेत. तसेच, 6 नोव्हेंबरला रविवार असल्याने, 7 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरु होतील.
माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्या आहेत. 13 नोव्हेंबरला रविवार असल्याने 14 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. या वेळापत्रकानुसार माध्यमिक शाळांना पाच-सहा दिवस जादा सुट्टी मिळणार आहे. विद्यार्थी-पालकांसोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्येही दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचे नियोजन करता येणार आहे.