शैक्षणिक अपडेट : राज्यात दिवाळी नंतर महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) व्हावे, यादृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण कॅम्प आयोजित करून केले जात आहे. कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये बसता येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास दोन डोस लसीचे न घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा निर्णय होऊ शकतो, असे राज्याचे उच्च शिक्षण विभागातील (Department of Higher Education) विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना 84 दिवसांनी दुसरा डोस घेतल्यावरच प्रवेश मिळणार!
दरम्यान मार्च 2020 पासून बंद असलेली महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु झाली असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. मात्र दुसरी लाट ओसरल्यांनतरही तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे कोवॅक्सिन असो वा कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना 84 दिवसांनी दुसरा डोस घेतल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. तर कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस टोचणे आवश्यक आहे.
‘मिशन यूथ हेल्थ’अंतर्गत महाविद्यालयांमध्ये 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना लसीकरण.
‘मिशन यूथ हेल्थ’अंतर्गत विद्यापीठांसह बहुतेक महाविद्यालयांमध्ये 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना लस टोचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये बसता येणार आहे. ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास दोन्ही डोस न टोचलेल्यांना परीक्षेला बसू द्यायचे नाही, असा निर्णय होऊ शकतो.