राज्यात 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यामुळे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.

थोडक्यात महत्वाचे 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या राज्यात 5200 पोलिसांची भरती करण्याचं काम जवळपास पूर्णत्त्वाच्या दिशेनं आहे. लेखी परीक्षा चाचणी झाली, शारिरीक क्षमता चाचणी झाली आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना राज्यात टप्प्याटप्प्यानं पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी होती.

राज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.