राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवणार ‘महावाचन उत्सव-२०२४’, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची बँड ॲम्बेसेडर म्हणून निवड

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवणार ‘महावाचन उत्सव-२०२४’, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची बँड ॲम्बेसेडर म्हणून निवडराज्यातील शैक्षणिक विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास शासननिर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.सदरच्या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यासदेखील राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते.

तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबवण्याबाबतचा निर्णय २२ नोव्हेंबर २०२३ रोजी शासननिर्णयाने घेण्यात आला होता.

गेल्या वर्षी ५ डिसेंबरला या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामध्ये ६६ हजार शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमास रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते.

२०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी, इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहे.

२२ जुलै २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा असल्याचे शासननिर्णयामध्ये म्हटले आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

असे असेल उपक्रमाचे स्वरूप

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र करतील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करून वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार च्या पोर्टलवर अपलोड करतील.

यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल. उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारी एक मिनिटाची व्हिडीओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.

वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरवण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गटशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची असेल.

अशी आहेत उद्दिष्टे :

■ वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.

■ विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.

■ मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.

■ दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे.

■ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे.

■ विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.